मुंबई : वृत्तसंस्था
‘सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरचा थरारक झेल घेत असताना मी श्वास रोखून बघत होतो. मला वाटलं, जर हा झेल सुटला, तर संघाचे विश्वविजेतेपदही निसटेल. पण, भारताचे हे विश्वविजेतेपद भाग्यामध्ये लिहून ठेवले होते. सूर्याचा तो ड्रोल अप्रतिम होता,’ असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले.
बार्बाडोस येथे धडकलेल्या बेरिल चक्रीवादळामुळे भारतीय संघ दोन दिवस तिथेच अडकला होता. अखेर हे वादळ शमल्यानंतर एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी यात्रा निघाली. यावेळी, लाखो क्रिकेट चाहत्यांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करत आपल्या विश्वविजेत्यांचे थाटात स्वागत केले. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह आणि खजिनदार आशिष शेलार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय संघाचा सत्कार करताना जाहीर केल्याप्रमाणे १२५ कोटी
रुपयांचे बक्षीस प्रदान केले.
रोहित म्हणाला की, ज्याप्रकारे आमचे मायदेशात स्वागत झाले ते पाहून भारावलो. देशासाठी विश्वचषक जिंकणे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. या विश्वविजेतेपदामध्ये प्रत्येक खेळाडूने मोलाचे योगदान दिले असून एका खेळाडूचे नाव नमूद करणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे, ‘२००७ सालचे टी- २० विश्वजेतेपदही विशेष होते. ते स्पर्धेचे पहिलेच पर्व होते आणि आपण जिंकलेलो, त्यावेळीही अशीच विजयी यात्रा निधाला आणि वानखेडे स्टेडियमवर जल्लोष झाला होता. त्यानंतर २०११ सालचे विश्वजेतेपद याच मैदानावर उंचावलेले आणि आता पुन्हा टी-२० विश्वचषक पटकावून तो येथेच आणला आहे. हा अनुभव शानदार आहे,’ असेही रोहित म्हणाला.