ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रायगडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका

रायगड : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

दरम्यान आज (सोमवार) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडावर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटकांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर तसेच नाणे दरवाजा येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग शिवभक्त पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्याचप्रमाणे रोपवे प्रशासनाने देखील आगामी 21 जुलै पर्यंत रोपवे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान काल रायगडवाडी येथील (40 वर्षीय) मनोज खोपकर हा इसम टकमक टोक परिसरात असलेल्या धबधब्यावरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्याकरता एनडीआरएफचे पथक शोध मोहीम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत राज्यातील सर्व शिवभक्तांना 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर पर्यटनासाठी येऊ नये असे सुचित करण्यात आले आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये महाड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येथे गोडाऊनची भिंत कोसळली असून अंशतः नुकसान झाले आहे.

महाड नवे नगर येथे पिठाची गिरणीचे अंशतः नुकसान झाले आहे. नातोंडी येथील घरांचे अंशतः नुकसान व बिरवाडी भैरवनाथ नगर येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!