गुजरात : वृत्तसंस्था
देशभरात 2020 मध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. या व्हायरसमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. या व्हायरसवरील प्रतिबंधासाठी नंतर कोरोना लस काढण्यात आली आणि इतर गोष्टींच पालन करण्याचे अनेक सल्ले देण्यात आले. कोरोनानंतर आता गुजरात या राज्यात चांदीपुरा नावाच्या एका व्हायरसने एन्ट्री केली आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत केवळ दोन दिवसांत चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
दोन दिवसांत चार बालकांचा मृत्यू
गुजरातमधील सांबरकांठा सिव्हिल रुग्णालयात झाला आहे. आता या मृत बालकांचे सॅम्पल पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या व्हायरसमुळे राज्यातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून एकच हळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार, या व्हायरसची लागण झालेल्या इतर दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांत चार मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग देखील सक्रिय झाला आहे. आता आरोग्य विभागाकडून नव्या व्हायरसबाबत साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यामध्ये सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
अशी आहेत लक्षणे
या चांदीपुरा व्हायरसची काही लक्षणे सांगण्यात आली आहेत. प्राप्त माहितीनुसार, चांदीपुरा या व्हायरसची लागण झालेल्या मुलांच्या मेंदूमध्ये सूज येत असल्याचे सर्वात मोठे लक्षण सांगण्यात आले आहे. त्याशिवाय इतरही काही लक्षण दिसत आहेत. आरोग्य विभागाकडून व्हायरसची लागण झालेल्या संक्रमित मुलांच्या कुटुंबियांचेही सॅम्पल घेतले जात आहेत. या व्हायरसनंतर आरोग्य विभागाने उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत टेस्टिंगसह इतर अनेक गोष्टींवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नमुने पुण्यात पाठवले
हिम्मतनगर सिव्हिल रुग्णालयात एकूण या व्हायरसने संक्रमित एकूण सहा रुग्ण दाखल होते. साबरकांठातील खेडब्रह्मा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर अरावली जिल्ह्यातील भिलोडातील दोघांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्यातील एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर आता आणखी एक सॅम्पल पाठवणे बाकी आहे.