मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा होण्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. नुकतेच समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात लोकांनी माझ्यासोबत राहावे. मग कुणी माई का लाल मुंबईत तुमच्या केसांना धक्का लावू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर भारतीयांच्या नादाला लागू नका, ते जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू असा इशारा देखील अबु आझमी यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता दिला आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांचे उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, माझ्यासोबत राहा, कोणताही ‘माई का लाल तुम्हारा बाल भी बांका नहीं कर सकता’. जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण होते तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येते? आता निवडणुका आल्या की भाजपवाले येतील, पण तुम्ही मला एकदा गृहमंत्री करा, मग त्यांना त्यांची नानी आठवेल असा इशाराही आझमी यांनी दिला आहे.
या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. आता सपानेही निवडणुकीची तयारी केली आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या सर्व खासदारांना एका कार्यक्रमासाठी मुंबईत बोलावण्यात आले आहे. हॉटेल रंग शारदा सभागृहात झालेल्या बैठकीत अबू आझमी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. महाविकास आघाडीवर दबाव आणण्यासाठी समाजवादी पक्ष आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी मुंबईत शक्तिप्रदर्शन करत आहे. उत्तर प्रदेशात सपाकडून विजयी झालेल्या 37 खासदारांपैकी 20 ते 25 खासदार मुंबईत आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अबू आझमी यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.