मुंबई : वृत्तसंस्था
आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुकीचा कहर सुरु होणार असून त्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण आतापासून तापले आहे. नुकतेच राज्यातील भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येवून गेले व त्यांचे भाषण जोरदार झाल्याने आता विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यातील तिन्ही भावी मुख्यमंत्रीच एकमेकांचे अधःपतन करतील. कारण ते मजबुरीने एकत्र आहेत असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांना टोला लगावला आहे. याशिवाय एनडीएच्या अर्थसंकल्पातून आम्हाला अपेक्षा आहेत, असे ते म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट भाष्य केले आहे.
नुकतेच झालेल्या भाजपच्या बैठकीत गृहमंत्री शहा यांनी भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असा दावा केल्याची चर्चा आहे. यावर राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”महाराष्ट्रातील महायुतीची परिस्थिती पाहिली तर सध्या 7 मुख्यमंत्री आहेत,. फडणवीस, शिंदे, पवार यांच्यासह केंद्रात दोन वेटिंगवर आहेत. शिवाय राज्यात फडणवीसांचा पाय कापून आपल्याला मुख्यमंत्री कसे बनता येईल यासाठी अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये रस्सीखेच आणि गोंधळाची परिस्थिती होण्याची शक्यता आहे”,असा दावा राऊतांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले, ”शहा यांच्या शब्दांवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण शिंदेच मुख्यंमत्री राहतील असेही ते म्हणाल्याचे मी ऐकले होते. मात्र आता ते बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री असेल असे सांगतात. मात्र देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री नक्कीच नाहीत. हे मी खात्रीने सांगतो. राज्यातील भावी तीन मुख्यमंत्री तीन दिशेला तोंडे करून उभे आहेत. हेच तिघे एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत. भाजप असा पक्ष ज्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे सर्वांनी सावधान राहिले पाहिजे ते राहतील कारण एकत्र राहणे त्यांची मजबुरी आहे”, अशी टीका राऊतांनी केली आहे.