ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर ; ‘या’ नेत्यांची घेणार भेट

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात सध्या निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या असतांना नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली असून त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान ते अनेक राजकीय पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील असणार आहेत. या दौऱ्यात ते नेमके कोणाच्या भेटी घेतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्यात विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार हे जवळपास निश्चित असले तरी राज्यात तिसरा आघाडीचा प्रयोग देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर या यावेळची निवडणूक ही अधिक चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे हे दिल्लीवारी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष तथा नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे आपल्या या भेटीत नेमकी कोणत्या नेत्यांना भेटणार आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे महत्त्व आधीच अधोरेखित झाले होते. त्यातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री पदाबाबत देखील ते काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!