सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जोरदार आंदोलन मनोज जरांगे पाटील नेहमी करीत आहे तर आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावर येवून ठेपली असून त्यासाठी जरांगे पाटील यांनी आता दौऱ्यावर निघाले असतांना या दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून झाली. यावेळी जरांगे पाटलांनी सोलापुरात सभा घेवून तुफान फटकेबाजी केली आहे.
भाजपमधील मराठे हे जर खरे मराठे असतील तर ते मराठा समाजाच्या बाजूनेच बोलतील. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलणार नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. आधी जातीसाठी काम करा आणि मग पक्षासाठी काम करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात सभा सुरू असताना, हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला. त्यावेळी जरांगे पाटील यांनी जातीसाठी भिजा, लोक निवडून येण्यासाठी भिजत असतात, असा खोचक टोला शरद पवारांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. नारायण राणे यांच्यावर देखील त्यांनी टीका केली.आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा, मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सोलापूर येथील शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी सर्वच पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. पालकमंत्री व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना जरांगे यांनी आदिमानव असे संबोधले.आम्ही आमच्या जातीलाच बाप मानतो. तुम्ही तुमच्या नेत्याला बाप मानतात. हा तुमचा आणि आमच्या संस्कारातला फरक आहे. मराठा समाजातील आंदोलकांवर देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलत असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातिवंत मराठा यापुढे घरात बसू शकत नाही. स्वतःच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने मराठा समाज उभे राहणार आहे. मराठा समाजातील कोणीच आता कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही, असे ते म्हणाले. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. अंतरवाली सराटी येथे निवडणुकीची दिशा ठरवली जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.