ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीस यांचे शब्द मंत्री भुजबळ बोलतात ; मनोज जरांगे पाटील

पुणे : वृत्तसंस्था

मनोग जरांगे पाटील यांनी सातारा येथून रविवारी सकाळी दहाच्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान केले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नसरापुरसह खेड शिवापूर टोल नाक्यावर फुलांची उधळण करण्यात आली. पुणे शहराच्या वेशीवर म्हणजेच कात्रज येथे मराठा सेवकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या माध्यमातून मोठा हार परिधान करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण रॅलीनंतर जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना भोवळ आल्याने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच त्यांना ऑक्सिजन कमी पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबत मराठा समाजाने चिंता व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, “काल जाहीर सभेनंतर मला काही आरोग्याच्या समस्या आल्या. ऑक्सिजन आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या रक्तदाब कमी आहे, पण मी माझ्या नियोजित कार्यक्रमासाठी आज नगरला जाणार आहे. त्यानंतर नाशिकला जाईन.” छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, मी छगन भुजबळांना गांभीर्याने घेत नाही. कारण ते जे काही बोलतात ते देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. भुजबळ केवळ राजकीय फायद्यासाठी बोलतात. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजात फूट पाडायची आहे. पण मराठे एकजूट आहेत. मी जोपर्यंत जिंवत आहे तोपर्यंत मराठे एकजूट राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!