मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यावर निघाले असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते त्यावर आता शरद पवारांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्यामुळे राज ठाकरे यांनी माझे नाव का घेतले हे मला कळत नाही, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले होते. शरद पवार यांच्या वयाचा दुसरा कोणताही नेता सध्या महाराष्ट्रात नाही. त्यांनी महाराष्ट्रात जातीय राजकारण पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण तेच त्याला हातभार लावत आहेत. महाराष्ट्राचा मणिपूर होईल असा इशारा ते देत आहेत. निवडणुका येतील आणि जातील, पण या जखमा भरून निघणार नाहीत. त्यामुळे पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण पसरवण्यात हातभार लाऊ नये, असे राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे यांच्या या विधानाविषयी पत्रकारांनी सोमवारी शरद पवार यांना छेडले असता त्यांनी जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन-तीनवेळा माझे नाव का घेतले हे कळले नाही. महाराष्ट्र मलाही थोडाफार समजतो. मणिपूरचा प्रश्न वेगळा होता. त्यात हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो? मी बोललो त्यातून हातभार कसा लागतो?
राज ठाकरेंनी विनाकारण माझे माझे नाव घेतले. मराठवाड्यात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. मी स्वतः मराठवाड्यात फिरलो. मलाही लोकांनी अडवले आणि निवेदन दिले. त्यामुळे महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो? असे शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले.