ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुप्तधन काढून देण्याचा बहाण्याने लाखो रुपयांत फसवणूक ; भोंदू बाबाला अटक

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल होत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहोळ तालुक्यातील एकुरके व डिकसळ परिसरातील लोकांना तुमच्या घरातील गुप्तधन काढून देतो, तुमच्यावर झालेले अनिष्ट, अघोरी संकट नाहीसे करून देतो, अशा पद्धतीचा बनाव करून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून मोहोळ पोलिसांनी अटक केली. या भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या भोंदू बाबाचा पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिवमूर्ती बिराजदार (रा. विठ्ठलवाडी, बेंबळी, जि.धाराशिव) असे या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष शिवमूर्ती बिराजदार या भोंदू बाबाने मोहोळ तालुक्यातील एकुरके व डिकसळ परिसरातील गावात गुप्तधन काढतो, अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा करून तुमच्यावर करणी करण्यात आली आहे. असे सांगून लाखो रुपये जमा केले होते.

ही माहिती मोहोळ येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यसरचिटणीस सुधाकर काशीद, रमेश अदलिंगे, धर्मराज चवरे, अजित गाडे, रमेश दास यांना एकुरके येथील सुदर्शन ढवण यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून मिळाली होती. मंगळवारी (ता.१३) अनंत ढवण यांच्या घरामध्ये टिकाव, खोऱ्याने खड्डा खोदत असताना त्याच्या शेजारी असलेल्या पाटीमध्ये ५० लिंबू, नारळ, हळद, कुंकू यांच्या पुड्यांसह सुभाष बिराजदारला पकडण्यात आले. याबाबतची फिर्याद धर्मराज चवरे यांनी दिली. या प्रकारणाचा पुढील तपास मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!