मुंबई : वृत्तसंस्था
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या तारखेच्या मुदतेत वाढ केली आहे. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याकरिता आता मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रूपये लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही त्यांना खोडा दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना केलंय.