अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात प्रथमच ‘प्रसादरुपी खुराक चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२४’ मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. फतेसिंह क्रिडांगण, इन्डोअर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अक्कलकोट तालीम संघाचे अध्यक्ष पै .महेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
कुस्तीला उभारणी व नव चालना, संजीवनी मिळण्यासाठी, नवोदित पैलवानांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मिळावी, अनेक होतकरू, कष्टकरी पैलवान समोर यावेत याकरिता गत जानेवारी पासून न्यासाकडून प्रसाद रुपी खुराक देण्यात येत आहे. सध्या कुस्तीक्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण आणि विकासात्मक प्रयत्न सर्व स्तरातून केले जात आहेत.
अनेक मैदानामध्ये नवोदीत होतकरू आणि चांगल्या पैलवानांना पाठबळ मिळवून देण्यासाठी अनेक वस्ताद मंडळी झटत असतात. खऱ्या अर्थाने विविध तालमीतील उदयोन्मुख पैलवान जपत असतात. कुस्ती जगवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे ओळखून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वनस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कुस्तीगीरांना न्यासाकडून प्रसाद रुपी खुराक देण्यात येत आहे. त्यामुळे कुस्तीगीरांना अच्छे दिन आले आहेत.
या चाचणी स्पर्धेतील विजेते वजनी गटात तीन प्रथम, द्वितीय, तृतीय मानांकित पैलवानास दरमहा खालीलप्रमाणे प्रसादरुपी लाभ मिळणार आहे. त्यांना तीन किलो तूप, तीन किलो बदाम, एक किलो खारीक, थंडाई मसाला देण्यात येणार आहे.
या चाचणी स्पर्धेकरिता डबल उपमहाराष्ट्र केसरी पै.मौलाली शेख, उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले, एन.आय.एस. कोच राष्ट्रीय पंच पै.धनराज भुजबळ, महाराष्ट चॅम्पीयन पै.तानाजी भोसले, सरफराज शेख, आतिष पवार यांच्यासह आदिजणाचे विशेष सहकार्य लाभत आहे. तरी या चाचणी स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन तालीम संघाच्या वतीने करण्यात आले आहे.