पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून बाप्पांच्या आगमनासाठी मोठी तयारी सुरु असून आज लाडक्या बाप्पाचे आगमन ढोल ताश्याच्या गजरात होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्हा तसेच पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी विजांच्या डकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात लागूनच 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओडिसा आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढतात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.