ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जीवनात सुख मिळवण्यासाठी अंतर्मन डोकावून पाहण्याची गरज

विवेकानंद प्रतिष्ठान व्याख्यानमाला पुष्प दुसरे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सुखाचा साक्षात्कार होण्यासाठी वास्तवात जगा,आनंद मिळविण्यासाठी समाधानी रहा,जीवनामध्ये सतत हे चित्र पाहिजे असेल तर अंतर्मनात डोकावून पहा,असा सल्ला प्रसिद्ध वक्ते प्रा.गणेश शिंदे यांनी अक्कलकोटकरांना दिला.मंगळवारी,येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.जीवन सुंदर आहे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रमुख वक्त्यांचा परिचय अशोक येणेगुरे यांनी करून दिला.प्रारंभी श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर प्रा.ओमप्रकाश तळेकर,ह.भ.प विरुपाक्षप्पा वैरागकर महाराज, आप्पा हळगुणकी, रतनलाल माळवदकर, मुकुंद पत्की, प्रा.भीमराव साठे आदींची उपस्थिती होती.शिंदे पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या जगण्याच्या संकल्पना वेगळ्या आहेत. प्रत्येक जण अंतर्मनात डोकावून पाहत नाही म्हणून त्यांना सुख लवकर मिळत नाही. अनेकांकडे पैसा आहे पण आनंद नाही.माणूस जेंव्हा मनातून हरतो तेव्हा रणांगणात हरतो हे लक्षात घेण्याची गरज आहे.मन हे चंचल आहे मनाला स्थिर करता आले पाहिजे ही ताकद सुद्धा आपल्यातच आहे.त्यासाठी संत विचाराचे आचरण आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आईचा गोडवा आहे म्हणून ज्ञानेश्वरांना ‘माऊली’ असे म्हटले जाते.बोलण्यात गोडवा असेल तर निम्म्या समस्या आपोआप मिटतील.संपत्ती किती का असेना. अहंकार मात्र बाळगू नका. आयुष्य हे खरंच क्षणभंगुर आहे.आयुष्यात एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात असा येणार आहे त्यावेळी कार्यक्रम आपला असणार आहे पण त्यात आपण नसणार आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.माणसाला तुलना ही गोष्ट कधीही समाधानापर्यंत घेऊन जात नाही म्हणून स्वतः आनंदी रहा,आनंद दुसऱ्यांना दाखवू नका. स्टेटस जरूर ठेवा पण ज्याच्यासाठी ठेवला ते जर नाही बघितले तर दुःखी होऊ नका.दोन गोष्टी निसर्गाने सांगितलेले आहेत.एक म्हणजे मनुष्य जन्माला येण्याचे संकेत नऊ महिने आधी मिळतात पण जाण्याचे संकेत नऊ मिनिट आधीसुद्धा मिळत नाहीत. दुसरी गोष्ट येताना आपण काहीच आणत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. निसर्गाशी जुळवून घ्या, माणूस खूप छोटा आहे.निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू नका. निसर्गाने आपल्याला खूप दिले आहे पण आपण निसर्गासाठी काही देत नाही हे कुठेतरी जाणा आणि त्या दृष्टीने गायचा प्रयत्न करा.  या जगामध्ये लाभाची अपेक्षा न करणारे दोनच व्यक्ती आहेत. ते म्हणजे आई आणि वडील हे लक्षात ठेवून जीवन जगा आणि आनंदी राहा असेही ते म्हणाले.यावेळी जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी,गुरुपादप्पा आळगी, इस्माईल मुरडी डॉ.विपुल शहा, निरंजन शहा, निनाद शहा, गजानन पाटील, दिनेश पटेल अतुल कोकाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सलोनी शहा यांनी केले तर आभार निशिगंधा कोळी यांनी मानले.

अपेक्षा कमी ठेवा, दुःख येणार नाही

जगातला सर्वात हुशार प्राणी कोण आहे असे जर विचारले तर माणसाचे नाव घेतले जाते आणि हे जाहीर कोण करते तर माणूसच. आपण निसर्गाकडून ओरबाडून घेतले पण त्यांना काही देण्याचा प्रयत्न आयुष्यात केला नाही.अपेक्षा कमी ठेवा,आयुष्यात दुःख फार कमी येईल.सुखी आणि समाधानाने जगण्यासाठी सर्वांनी हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवा, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!