मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दहा दिवसापासून प्रत्येकाच्या घरात व मंडळात लाडक्या बाप्पांचे आगमन झाले होते आज बाप्पा निरोप घेत असतांना प्रत्येक गणेशभक्त आज भावूक झालेला दिसत असून आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकड आणि वादळ वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र सोबतच वादळ आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबर कोकणात देखील आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे गणेश उत्सवाच्या मिरवणुकीतच मुंबई आणि उपनगरामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबईचे कमाल तापमान देखील 32°c च्या जवळपास राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र आज हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील ताशी 30 ते 40 प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दिवसभर ढग विरळ होते. सूर्य तळपत होता. परिणामी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.8 अंशानी वाढ होऊन ते 32.0 आणि किमान तापमान 21.2 अंश सेल्सियस नोंद झाली. गेल्या 24 तासांत शहर परिसरात 3 मिमी पाऊस पडला. दरम्यान, आज अनंत चतुर्दशी आहे. श्रीगणेशाचे विसर्जन उत्साहात होणार आहे. दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. पोषक वातावरण असलेल्या ठिकाणीच पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.