मुंबई : वृत्तसंस्था
देशात नुकतेच ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
खा.राऊत म्हणाले कि, संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आम्ही आधीपासूनच करत आहोत. ती बदलली जात आहे, संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, ती बदलली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या माध्यमातून तोच प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आधी महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. मोदींचा कदाचित भविष्यातील ‘नो इलेक्शन’ हा नारा असेल. आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही त्याची सुरुवात असल्याचा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
I.N.D.I.A. आघाडीच्या माध्यमातून या विषयावर चर्चा केली जात असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे विधेयक ज्या वेळेस संसदेत मांडले जाईल, त्या आधी आम्हाला चर्चा करावी लागणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणारे असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. घटनेमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी संविधान निर्मात्यांनी करून ठेवलेल्या आहेत. त्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मोदी त्याच संविधानावर हल्ला करताना दिसत असल्याचे देखील राऊत त्यांनी म्हटले आहे.
एकत्रित निवडणुका घेतल्यास खर्च कमी होऊ शकतो. या प्रश्नावर देखील संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागले. ते अर्थतज्ज्ञ कधी झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतक्या वर्षांमध्ये अशाच प्रकारे निवडणुका झाल्या आहेत. त्यात कधीही अडचणी आल्या नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संविधान बदलण्याचा हा मोदी यांचा एक घाट असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. मोदी हे संविधानावर हल्ला करत असल्याचे देखील ते म्हणाले.