सोलापूरची विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्यावर शिक्कामोर्तब
दिल्लीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक, तत्पूर्वी कमर्शियल फ्लाईटस सुरू करण्याच्या हालचाली
अक्कलकोट : प्रतिनिधी
सोलापूरची विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय पातळीवर सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे.या पार्श्वभूमीवर काल पुन्हा एकदा केंद्रीय नागरी विमान वाहतूक
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर अखेर उडान योजनेअंतर्गत सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.तत्पूर्वी कमर्शियल फ्लाईट सुरू करण्याचाही विचार या बैठकीमध्ये झाला असून यासाठी काही कंपन्यांना बोलविण्यात आले होते त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून ती सेवा आधी सुरू करण्याचा मानस असल्याचे आणि तसा निर्णय या बैठकीमध्ये झाला असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शनिवारी, नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बैठक लावण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला होता.त्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.यामध्ये विमान सेवेतील अडचणी आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रक्रिया याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.सोलापूरच्या सर्वागीण विकासासाठी अनेक वर्षांपासून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.ती केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आता पूर्णत्वास जात आहे.यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, असे ते म्हणाले.या बैठकीत प्रामुख्याने
उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
जी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे व याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल. यात सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने घेतले जाईल, असा निर्णय या बैठकीमध्ये झाल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले. विमानतळाच्या ठिकाणी सर्व कामे पूर्ण झाली आहेत.सोलापूरकरांना विमानसेवेची मोठी उत्सुकता आहे. विमानसेवेमुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळेल,असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.मागच्या महिन्यात २८ तारखेला एक बैठक झाली होती. यामध्ये केंद्र सरकारने उडान-आरसीएसच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर ५० कोटी रुपये खर्च करून विकासकामे केली आहेत.विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच ते सेवेत दाखल होणार आहेत.डीजीसीए लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रीमहोदयांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पुढे हे काम सुरू आहे,असे आमदार कल्याणशेट्टी यांनी संचार ‘शी’ बोलताना सांगितले.या बैठकीस मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, फ्लाय ९१ व अलायन्स एअरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ?
हवाई मार्गा संदर्भांत आता निविदा प्रसिद्ध झाली आहे त्याची मुदत संपताच सर्व प्रक्रिया नोव्हेंबरच्या आत पार पडेल.तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या २६ सप्टेंबर रोजी याचे उद्घाटन देखील होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली केंद्रीय स्तरावर सुरू असल्याचे समजते.