मुंबई : वृत्तसंस्था
शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्ह्यातील साडेअकरा लाख लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी शुक्रवारी शिर्डीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिर्डी येथे महिला सशक्तीकरण मेळावा होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहणार असून अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दीड करोड पेक्षा जास्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या तिसऱ्या हप्ता 29 सप्टेंबर महिन्याच्या आखरी आठवड्यात शासनातर्फे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे. त्यासाठी पात्र झालेल्या महिलांनी आपल्या बँक खाते त्वरित आधार कार्डची लिंक करून ठेवावे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास कोणती अडचण निर्माण होणार नाही.