ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : यंदाची दिवाळी होणार गोड !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.आत्तापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 मिळाले आहेत पण ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पुढील दोन महिन्यांचे अर्थातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा बीड येथील एका सभेत केली आहे.

अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रा काढली असून त्यांची ही यात्रा काल मराठवाड्यातील बीडमध्ये पोहोचली. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे त्यांनी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच मिळणार अशी घोषणा केली. अजितदादा यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात असे संकेत दिलेत. 10 ऑक्टोबरला आगामी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करू हा अजितदादांचा वादा आहे असं म्हणत लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!