मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मला इंजेक्शन देऊन सुरतला नेल्याचा आरोप केला होता. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या दाव्याचे जोरदार समर्थन केले आहे. अनेक आमदारांना जेवणातून, औषधांतून गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यांना बधिर करण्यात आले होते. विशषतः नितीन देशमुख यांना तर थेट जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, असे ते म्हणालेत.
आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी सुरतला गेले होते. पण ते अर्ध्या रस्त्यातूनच परत आले. त्यानंतर शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनेतील बंडावेळी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केला. मी सुरतला गेलो होतो. तेव्हा माझा घातपात करण्याचा प्रयत्न झाला. मला एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरली. पण मला कोणताही झटका आला नव्हता. त्यांना माझा घातपात करायचा होता. भाजपच्या एका आमदारानेच मला हे सांगितले. दिल्लीवरून एक फोन आला होता, कोणत्याही परिस्थितीत देशमुख परत जाता कामा नये, गरज भासली तर त्यांचा गेम करून टाका, असे निर्देश असल्याचे त्यांनी मला सांगितले, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी नितीन देशमुख यांच्या या दाव्याचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, अनेक आमदार सुरत, गुवाहाटीला गेल्यानंतर 4-5 दिवस गुंगीत होते. ते जिथे राहत होते, त्या ठिकाणच्या किचनचा ताबा दुसऱ्या लोकांनी घेतला होता. आमदारांनी आपल्याला खाण्यापिण्यातून काहीतरी दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. हे सिद्ध करण्यासाठी आमचेकडे पुरावे नाहीत. पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचे की, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते गुंगीत आहेत. शुद्धीवर नाहीत.