सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांची किमत काय कळणार, अशी टीका केली होती. त्याला खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणीस यांना 50 गद्दारांचे शिलेदार असे संबोधले आहे. याशिवाय, लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीची निधी वळविल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांना 50 गद्दारांचे शिलेदार, असे म्हटले आहे. पन्नास खोके गॅंगचे शिलेदार काल बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. मात्र, एक महिला तुमचा पराभव करते, तेव्हा भाजपवाले खरंच संतापतात. तिथे मात्र लाडक्या बहिणींचा कुठलाही मान सन्मान ठेवत नाहीत, असा आरोप केला आहे.
शिंदे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीमधून सहा कोटी रुपये घेण्यात आले आहेत. एसी, कुलर, पंख्यासाठी हा निधी वापरण्यात आला आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. एकीकडे प्रसूतीगृहात साधनसामग्री नाही, उमेद अभियानासाठी पैसे नाहीत. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीतून सहा कोटी रुपये घेण्यात आले आहेत.
गावागावांतून महिलांना कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. त्या कार्यक्रमात 50 खोके गॅंगचे शिलेदार माझ्या संदर्भात बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. मात्र, हीच तुमची लाडकी बहीण गोरगरीब महिला, कामगार यांच्यासाठी तुमच्यासमोर उभे राहून काम करतेय, झटतेय, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, एक महिला तुमचा पराभव करते, तेव्हा बीजेपीवाले संतापतात. तिथे मात्र लाडक्या बहिणींचा कुठलाही मान सन्मान ठेवत नाहीत. काल सत्ताधारी मंडळी खरं बोलले की पैसे देऊन प्रेम विकत घेता येत नाही. हे खरंच आहे की, दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीचे प्रेम विकत घेता येणार नाही.
वचनपूर्तीसाठी आतापर्यंत ढोल ताशांचा वापर करणारे तोंडावर पडणार आहेत. कारण, त्यांची वचनपूर्ती खोटी ठरणार आहे. येत्या एक दोन आठवड्यामध्ये पुन्हा एकदा हे धर्म जात पाती वर येणार आहेत. कारण त्यांनी ठरवलेली सर्व स्ट्रॅटेजी फेल जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी ही महायुती विरोधात लढणार आणि महाविकास आघाडी एक स्थिर सरकार राज्याला देणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.