मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या निर्णयांचा धडाका सुरु असतानाच गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. मात्र अजितदादांनी हे वृत्त तथ्यहीन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून नियोजित कार्यक्रमासाठी लातूरला गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याने महायुती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण घोषणांचा सपाटा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुरु ठेवला. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीतही अनेक घोषणांचा पाऊस पाडला जाईल, अशी शक्यता होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रोम प्रोजेक्ट असलेला अलिबाग- विरार कॉरिडोअरच्या प्रकल्पाबाबतही घोषणा केली जाणार होती. मात्र, या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी न दिल्याने याची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठकीत थेट नाराजी व्यक्त केल्याचे कळते. या प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सह्या झाल्या होत्या.
मात्र अजित पवार यांनी सही केली नसल्याने त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारणा केली. तसेच तुम्ही ते केले नाहीत तरी मी माझ्या अधिकारात ते करून घेईन, असा टोलाही त्यांनी लगावल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या अजित पवारांनी बैठक अर्धवट सोडून तिथून निघून जाणेच पसंत केले. अलिबाग-विरार कॉरिडोरसोबतच बारामतीतीलही काही प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजूर होत नव्हते. बारामतीतील प्रस्ताव अजित पवार यांच्याकडून मंजूर होत नसतील तर ते शरद पवार यांच्याकडून आलेले असावेत काय, अशीही चर्चा होती.
कॅबिनेट बैठकीनंतर लातूरमधील उदगीर येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी नांदेड विमानतळावर जायचे होते. कॅबिनेट बैठक 11 वाजता नियोजित होती, मात्र ती ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा सुरु झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून लवकर निघालो. कॅबिनेट अर्ध्यावर सोडून दहा मिनिटात निघाल्याचे वृत्त चुकीचे आहे, असं अजित पवार म्हणाले.