ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तीर्थक्षेत्र अक्कलकोटला सुसज्ज सभागृहाबरोबर क्रीडांगणाची आवश्यकता

लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या सुविधा

अक्कलकोट : मारुती बावडे

अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचा झालेला विस्तार ,वाढती लोकसंख्या आणि भाविकांची गर्दी पाहता अक्कलकोटच्या पायाभूत विकासातही आणखी भर टाकण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरामध्ये सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर किंवा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या धर्तीवर एखादे सुसज्ज नाट्यगृह हवे,अशा प्रकारची चर्चा शहरवासीयांमधून होऊ लागली आहे. याशिवाय लहान मुले किंवा तरुणांसाठी फत्तेसिंह क्रीडांगणा व्यतिरिक्त मोठे क्रीडांगण नाही त्यासाठी ही स्वतंत्र जागा आरक्षित करून आणखी एखाद्या नवीन क्रीडांगणाची निर्मिती करावी,असा देखील सूर तरुणांमधून उमटत आहे.

अक्कलकोट शहराचा मागच्या वीस वर्षाचा इतिहास पाहिला तर दिवसा गणिक भाविकांची संख्या ही वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सोयी सुविधांची ही तितक्याच पद्धतीने वाढ होण्याची गरज आहे. त्यामानाने अजूनही शहरात काही गोष्टी गरजेच्या आहेत, असे वाटते. पूर्वी प्रियदर्शनी मंगल कार्यालय वगळता कुठेही कार्यालयं नव्हती पण अलीकडच्या दहा वर्षात शहराच्या चोहूबाजूने मंगल कार्यालय झाली आणि आता त्या त्या भागातील नागरिक त्या त्या मंगल कार्यालयामध्ये आपले शुभकार्य करू लागले परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रियदर्शनी मंगल कार्यालयात मात्र केवळ उत्सव आणि लग्न समारंभ होतात.

नगर परिषदेच्या मालकीचे हे सभागृह आहे. याठिकाणी इतर प्रोफेशनल कार्यक्रम करता येत नाहीत.त्या पद्धतीने त्या कार्यालयाची रचना नाही.विशेष:ता एखादं नाटक जर बाहेरून अक्कलकोटला आणले तर त्या नाट्य कलाकारांना त्या ठिकाणी आपली कला नीट सादर करता येत नाही.मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.सेटअप नीट लावता येत नाही. नाट्य कलाकारांच्या दृष्टीने हे सभागृह सोयीचे नाही,असे कलाकारांनीच मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सांगितले. यावरून अक्कलकोट शहराला
एका सुसज्ज सभागृहाची नितांत गरज आहे. त्या ठिकाणी नाटक,सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील.जेणेकरून मोजक्या लोकांसाठी ते सभागृह असावे.साधारण त्याची क्षमता ३०० ते ५०० लोकांपर्यंत असली तरी चालेल, असा देखील सूर हा नागरिकांमधून उमटत आहे. अलीकडच्या काळात छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमुळे मूळ संस्कृतीकडे दुर्लक्ष होत चालले आहे पण मूळ संस्कृतीला हरवून कसे चालणार.त्यासाठी नाटक, पोवाडे, भारुड,संगीत यासारख्या संस्कृती कार्यक्रमांना एक प्लॅटफॉर्म तालुक्यामध्ये हवा. तसं पाहिलं तर लग्न समारंभासाठी अनेक सभागृह आहेत पण हुतात्मा स्मृती मंदिर किंवा  हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अँपी थिएटरच्या धर्तीवर नगरपरिषदेकडून स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता आहे.त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न देखील करण्याची गरज आहे.सध्याच्या नगर परिषदेच्या इमारतीच्या समोरच्या बाजूला नगर परिषदेची खुली जागा आहे. त्या ठिकाणी एखादी नगर परिषदेची भव्य प्रशस्त इमारत आणि त्यामध्ये अंतर्गत सभागृह बांधून ही कमी भरून काढता येईल.मध्यंतरी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल असताना नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला होता.पुढे त्याला निधी मिळू शकला नाही त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.पुढे ती फाईल तशीच पडून राहिली.ती फाईल रिवाईज करून त्याचा पाठपुरावा करता येईल,अशी चर्चा जाणकारांमधून व्यक्त होत आहे.त्या दृष्टीने आता लोकप्रतिनिधींकडून देखील पाठपुरावा होण्याची आवश्यकता आहे.त्याशिवाय अक्कलकोट शहराची लोकसंख्या ही जवळपास आता ६० हजारच्या घरात आहे.

पण अक्कलकोट शहराच्या लगत स्टेशन रोडला ए – वन चौकाजवळ जे फत्तेसिंह क्रीडांगण आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही शहरांमध्ये मोठे क्रीडांगण नाही.या एकाच ठिकाणी आता संपूर्ण शहरातील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.तालुक्यातील क्रीडा स्पर्धा असतील किंवा रोजचे व्यायाम असतील यामुळे तर खूपच गर्दी वाढली आहे.शहरालगत एखादी जागा बघून त्या ठिकाणी सर्व सुविधांनी सज्ज असे क्रीडांगण होण्याची गरज आहे. आजचा युवक हा उद्याच्या भारताचा नागरिक आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची आणि खेळाची गरज आहे.ही बाब लक्षात घेऊन पालकांनी देखील याबाबती एखादे क्रीडांगण अक्कलकोटला हवे,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.त्यासाठी शासनाकडून मोठा निधी आणून सुसज्ज क्रीडांगण उभा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.शहराचा वाढलेला विस्तार पाहून ही गोष्ट अतिशय गरजेची वाटते. आज मैंदर्गी रोड, बासलेगाव रोड,जेऊर रोड तसेच हन्नूर रोड या सर्वच भागांमध्ये नागरिकांची वस्ती वाढलेली आहे वर्दळ वाढलेली आहे.या सर्वच मंडळींना फत्तेसिंह क्रीडांगणाशिवाय पर्याय नाही. एखाद्या मोठ्या नेत्यांची मोठी जाहीर सभा घ्यायची म्हटलं तरी पुरेशी जागा नाही अशी सध्या शहराची अवस्था आहे. ही बाब ओळखून लवकरात लवकर शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत स्वतंत्रपणे किमान एक तरी मोठे क्रीडांगण मंजूर होण्याची गरज आहे.

हद्दवाढ भागाचा विकास हवा

अक्कलकोट शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. शहरातील जागेचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पण हद्दवाढ भागातील रस्त्यांची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे. पण लोकांची गरज म्हणून जागोजागी घर बांधून लोक राहिले आहेत.या रस्त्यांसाठी स्वतंत्रपणे निधी देऊन सर्वच अंतर्गत रस्ते कॉंक्रीट करण्याची गरज आहे.

समर्थ नगर ग्रामपंचायतीला मोठा निधी हवा

अक्कलकोट शहराच्या लगतच असलेल्या समर्थ नगर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये निम्मे अक्कलकोट शहर वसलेले आहे. पण
या ग्रामपंचायतीच्या तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या तुलनेमध्ये तिथे म्हणावा तसा विकास होत नाही किंवा निधी मिळत नाही.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्याचे शहरीकरण करण्याची गरज आहे किंवा नगरपंचायतीमध्ये त्याचा समावेश करून
स्वतंत्र विकास आराखडा बनवून त्याच्या विकासाची आवश्यकता आहे.

अक्कलकोट स्टेशन रस्ता चौपदरी हवा

अक्कलकोट शहराच्या चारी बाजूने रस्त्याचे जाळे निर्माण होत असताना अक्कलकोट
ते अक्कलकोट रेल्वे स्टेशन हा रस्ता मात्र अजूनही दुपदरीच आहे. वाहनांच्या गर्दीने त्या ठिकाणी घुसमट चालू आहे.वारंवार अपघात होत आहेत. हा रस्ता सिमेंट काँक्रेटने चौपदरी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच पावले टाकण्याची गरज आहे.

सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा

अक्कलकोट तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशनचा विकास करून या ठिकाणी सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देऊन अक्कलकोट शहराची कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण भारताशी करण्याची गरज आहे असे झाल्यास सोलापूरला रेल्वे स्टेशनला कोणालाही जाण्याची गरज पडणार नाही किंवा एखादी रेल्वेच थेट मी समर्थांच्या नावाने अक्कलकोटवरून मुंबई अशी देखील करता येऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!