ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहाटेच्या सुमारास पार पडला तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा

मुंबई :  वृत्तसंस्था

राज्यात सर्वत्र गेल्या दहा दिवसापासून नवरात्र महोत्सवाची धामधूम सुरु होती. श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीजींचे माहेर असणाऱ्या अहिल्यानगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीजींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.पिंपळाच्या पारावर देवीजींची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली.

मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार,आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. तुळजाभवानी देवीजींची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जातात. यावेळी देवीजींच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून 108 साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार अहिल्यानगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले.यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंबासे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ,उपाध्ये पुजारी मंडळ व भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!