ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : राज्यात निवडणुकीची घोषणा ‘या’ दिवशी होणार मतदान !

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यात पुरुष मतदार 4.95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 56,997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नवमतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!