मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता महायुतीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून एक महत्त्वाचे विधान केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. यातील एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना दिला. सध्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
“शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे विधान अमित शाह यांनी एका बैठकीदरम्यान केले. सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. तसचे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले जाणार की कोणी दुसरा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी असणार, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.