ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामींच्या दरबारातील फुलांच्या निर्माल्यातून अगरबत्तीची निर्मिती

भक्तीचा सुगंध घरोघरी दरवळणार, प्रायोगिक चाचणी पूर्ण

 

अक्कलकोट वृत्तसंस्था 

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री  महाराज यांच्या भक्तांची महिमा आणि  त्यांना मानणारा वर्ग संपूर्ण जगात आहे. त्यांच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेले असतात. त्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर भाविक येत असतात अशातच वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान स्वामी भक्तांसाठी एका वेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी करत आहे. स्वामींच्या दरबारातील निर्माल्याचा अनादर होऊ नये आणि भक्तीचा सुगंध घरोघरी दरवळावा यासाठी स्वामी मंदिरामध्ये जे रोज फुलांचे निर्माल्य तयार होते. त्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवून त्याचा सुवास घरोघरी देण्याचा निर्णय वटवृक्ष देवस्थान समितीने घेतला आहे. याची प्रायोगिक चाचणी पूर्ण झाली असून ती आता विस्तारित स्वरूपात लवकरच स्वामी भक्तांसमोर येणार आहे.

अक्कलकोटचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये आजही माणुस कितीही व्यस्त असला तरी वर्षातून एकदा तरी धार्मिक पर्यटनासाठी हा घराबाहेर पडत असतो. अलीकडच्या काळात तर स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी वाढतच चालली आहे. ही गर्दी आणि पडणारे निर्माल्य लक्षात घेता याचा विनियोग चांगल्या कामासाठी केला जावा.  अशी एक संकल्पना समोर आली आणि त्याला साथ मिळाली.  पुण्याच्या पेशाने इंजिनियर असलेल्या विवेक कानडे  यांची यानंतर वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि कानडे यांच्यामध्ये या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा होऊन ही अगरबत्ती तयार देखील झाली असून दोनच दिवसांपूर्वी ती अक्कलकोटमध्ये वितरित करण्यात आली.

स्वामी कृपा अगरबत्ती असे तिचे नाव आहे. खरे तर टेंपल फ्लॉवर रिसायकलिंग हा प्रकल्प सर्वच मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी राबविण्याची गरज आहे. हा प्रयोग कदाचित राज्यातला पहिला असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कानडे हे ऑगस्ट २०२३ मध्ये जेव्हा परदेशातून मातृभूमीत परतले. त्यावेळी समाजाला काही तरी परत देण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली आहे.

कानडे हे मनापासून धार्मिक असल्याने त्यांनी देशात परतल्यानंतर अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या. यातून त्यांना प्रदूषणाची फार  मोठी समस्या जाणवली. भारतात  जवळजवळ हजारो टन फुले दररोज धार्मिक समारंभात वापरली जातात आणि बहुतेकदा ती नद्या, कचराकुंड्या किंवा मोकळ्या जागेत टाकून दिली जातात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. फुलांची विल्हेवाट नीट न लावल्याने जलचरांना गंभीर हानी पोहोचते. यातील अनेक फुलांमध्ये आर्सेनिक, शिसे आणि कीटकनाशके असतात. जे पाणी प्रदूषित करतात आणि ते खाणारे मासे आणि बेडूक यांसारखे वनस्पती आणि प्राणी धोक्यात आणतात. गटारांमध्ये फेकलेली फुले केवळ धार्मिक भावनांचाच अनादर करत नाहीत  तर ड्रेनेज सिस्टम देखील बंद करतात. त्यामुळे सर्वत्र स्वच्छतेची समस्या सुद्धा उद्भवते. यावरच्या उपायांच्या शोधात. 

 भारताच्या काही भागांमध्ये कंपन्या पवित्र गंगा नदीतून वापरलेली फुले गोळा करत आहेत आणि त्यांचे अगरबत्तीमध्ये रूपांतर करत आहेत. ही प्रक्रिया केवळ फुलांच्या विल्हेवाटीच्या समस्येकडे लक्ष देत नाही. तर सेंद्रीय घटकांचा वापर करून आणि कोळसा टाळून पर्यावरणास अनुकूल आणि आरोग्यदायी अशी अगरबत्ती तयार करते.

बहुतेक व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या अगरबत्तीमध्ये कोळसा आणि इतर स्वस्त रसायने असतात जे जाळल्यावर कार्बन मोनॉक्साईड-हा हानिकारक वायू सोडतात. कोळशावर आधारित धूप घरामध्ये जाळल्याने दमा आणि इतर फुफ्फुसाच्या आजारांसह श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढतो. कोळसा टाळून टेम्पल फ्लॉवर रिसायकलिंग प्रकल्पाचे उद्दिष्ट अधिक सुरक्षित, आरोग्यदायी अगरबत्ती तयार करणे आहे. यातूनच हा प्रकल्प साकारत असून या प्रकल्पासाठी मंदिरामधून वापरलेली फुले गोळा करण्यात येत आहेत. सेंद्रिय पद्धतीने ती वाळविली जातील आणि त्यावर बारीक पावडर बनविली जाईल. या पवित्र पावडरमध्ये नंतर सेंद्रिय घटक आणि आवश्यक तेले मिसळून उदबत्ती तयार केली जाईल.

जी कोळसा, अल्कोहोल आणि इतर कोणत्याही हानिकारक रसायनांशिवाय आरोग्यासाठी सुरक्षित असेल. यात स्थानिक फुलांच्या कचरा समस्येचे देखील निराकरण होणार आहे. हा प्रकल्प वंचित महिला आणि स्वयं-सहायता गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचा आहे. धर्मादाय आणि विकासात्मक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी नफ्यातील काही भाग मंदिरासाठी दिला जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्वामी  समर्थ मंदिरातील निर्माल्याची समस्या ही कमी होणार आहे आणि भाविकांना या निमित्ताने पवित्र अशा सुवासित अगरबत्तीचा सुगंध थेट स्वामींच्या दरबारातून आलेल्या फुलातून घरी घेता येणार आहे. हा एक खूप वेगळा प्रयोग आहे आणि तो अत्यंत विचारपूर्वक करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

 

निर्माल्याचे पावित्र्य राखले जाईल

 

स्वामी समर्थांच्या मूळ गाभाऱ्यातील फुलांचे निर्माल्य आणि गंगेचे पाणी या दोन्ही पवित्र गोष्टी आहेत. त्यामुळे भाविकांची श्रद्धा  आणि विश्वास लक्षात घेता आम्ही अगरबत्ती बनवण्याचा निर्णय घेतला आहे.  यातून मंदिराचे पावित्र्य सुद्धा जपले जाणार आहे. याला मोठा प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे. 

– महेश इंगळे वटवृक्ष देवस्थान

 

 

सार्वजनिक आरोग्याची चिंता 

खुल्या भागात सोडलेली फुले कुजतात. दुर्गंधी आणि हानिकारक जीवाणू निर्माण करतात. याव्यतिरिक्त, गायी आणि इतर प्राणी बहुतेकदा ही फुले खातात, ज्यात कीटकनाशके आणि प्लास्टिक गुंडाळलेले असू शकतात, ज्यामुळे प्राण्यांना हानी पोहोचते यावर देखील हा एक चांगला उपाय मानला जात आहे.

 

 

अक्कलकोटला प्लांट उभारणार

सध्या आम्ही अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातून फुले (निर्माल्य) गोळा करतो आणि प्रक्रियेसाठी पुण्याला नेतो. येत्या काही दिवसांत ऑपरेशन्स सुरळीत झाल्यावर आम्ही संपूर्ण प्लांट आणि यंत्रसामग्री देवस्थानच्या साह्याने अक्कलकोटला हलवण्याची योजना आखत आहोत. यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांचे सक्षमीकरण होईल.

विवेक कानडे,पुणे

 

 

अशी होणार अगरबत्ती ..!

वापरलेली फुले गोळा करणे आणि त्यांना वेगळे करणे आणि पाकळी वेगळे करणे, त्यानंतर पाकळया सोलर ड्रायरमध्ये वाळविल्या जातात. वाळलेल्या पाकळ्या नंतर हाताने कुस्करून पावडरमध्ये रूपांतरित केल्या जातात आणि नंतर त्या पावडरमध्ये चंदन पावडरसह इतर काही सेंद्रिय घटक आणि आवश्यक तेले मिसळले जातात. हे मिश्रण पवित्र गंगाजलात मिसळले जाते आणि बायकांनी बांबूच्या काठीवर हाताने गुंडाळून सेंद्रिय अगरबत्ती तयार केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!