तासगाव वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून प्रचार सभा सुरु झाल्या आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर. आर पाटील यांनी आपला केसानं गळा कापला असा खळबळजनक आरोप तासगाव इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी आपल्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हा आरोप केला.
तासगावमध्ये संजय पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांच्यात लढत होत आहे. संजय पाटील यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, “माझ्यावर आरोप झाले मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याच्यावर ७० हजार कोटींचा आरोप करूयात, असं म्हटलं गेलं. सारखं ७० हजार, ७० हजार कोटी म्हणायचं. अजितराव घोरपडे हे त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. महाराष्ट्राची १ मे १९६० रोजी निर्मिती होऊन, माझ्यावर आरोप झाला त्या दिवसापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि सगळा प्रशासकीय खर्च हा ४२ हजार कोटी इतका होता. पण मी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला. मी म्हटलं इतक्या वर्षात कधी इतका खर्च झाला नाही आणि माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप कसा काय?
पण आकडा जेवढा मोठा तेवढं लोकांना वाटतं की खरंच असेल बरं का! झालं माझी वाटचं लागली. त्यातून एक फाईल तयार झाली, ती फाईल पुढे गृहखात्याकडं जाते. त्यांनी त्या फाईलवर अजित पवारांची खुली चौकशी व्हावी असं लिहून सही केली. केसानं गळा कापायचे धंदे आहेत राव. त्यानंतर आपण पृथ्वीराजबाबांचा पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट आली. त्यावेळचे राज्यपाल म्हणाले मी या फाईलवर सही करणार नाही. निवडून आलेले मुख्यमंत्री सही करतील ही लोकशाही आहे, मी असं काही करणार नाही.
त्यानंतर निवडून आलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली. मला नंतर त्यांनी घरी बोलवून सांगितलं की, ही फाईल मुख्यमंत्र्य़ांच्या सहीसाठी राहिली होती. तुमच्या आबांनी तुमची चौकशी सुरु करण्यासाठी सही केली होती. बघा केली की नाही? आणि खरंच तिथं त्यांची सही होती” अशा शब्दांत अजित पवारांनी दिवंगत आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.