सोलापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. पण पंढरपूर तालुक्यातील गावांना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एका तरुण साखर कारखानदारने १ लाखाचे बक्षीस जाहीर केलं आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले आणि केवळ ३५ वयाचे असलेल्या अभिजित पाटील यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत करोनाचा धोका टाळून गावाची एकी मजबूत करण्यासाठी एका तरुण खाजगी साखर कारखानदाराने तालुक्यातील गावांना बिनविरोध निवडणूक करून एक लाखाचे बक्षीस मिळवण्याचा अभिनव उपक्रमाची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे. अभिजित पाटील यांचे उस्मानाबाद येथे धाराशिव साखर कारखाना, नाशिक येथे वसंतदादा पाटील सह साखर कारखाना तर नांदेड येथे DVP वेंकटेश्वरा साखर कारखाना असे तीन कारखाने असून प्रत्येक कारखाना चांगल्या रीतीने चालवला जात आहे.
सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष जर एकत्रित सरकार चालवत असतील तर याचा आदर्श पंढरपूर तालुक्यातील गावांनी घेऊन गावातील एकी भक्कम करीत बिन विरोध ग्रामपंचायत निवडणूक करावी असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे. ज्या गावात बिनविरोध ग्रामपंचायत होईल त्या प्रत्येक गावाला एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे. आता याला पंढरपूर तालुक्यातील गावगाड्यातील जनता कशी प्रतिसाद देते हे लवकरच समोर येणार असले तरी किमान यामुळे गावातील गट तट संपून एकी भक्कम झाल्यास गावाचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास सुरुवात होईल.