ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“शक्यतो पाडापाडी कराच पण.. मनोज जरांगेचे आवाहन

जालना वृत्तसंस्था 

राज्यात विधानसभा निवडणुक तोंडावर आली असून मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आवाहन केले आहे.  अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. या समाजाला मायबाप मानले आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्या प्रचाराला आणि सभेला जाऊ नका. माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचे, पण शक्यतो पाडापाडी कराच, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

 

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. उमेदवारी यादी दिली होती. पण मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली, ते समजले नाही. त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, असे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी आंबेडकर यांना माघारी बोललेलो नाही. मी एखाद्याला मानतो म्हटले की, मानतोच. माझ्यासोबत ते असले की, चांगले म्हणायचे आणि नसले की वाईट तसे नाही. ते काही म्हटले तरी मी उत्तर देणार नाही. उभे केलेले उमेदवार जर पडले असते तर समाजाला हिणवले गेले असते, टोमणे मिळाले असते, त्यामुळे समाजाची मान खाली जाईल म्हणून माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले.

 

पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचे. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. समाजाचे भविष्य बघायचे आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. त्यांच्यासाठी सहा कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मूर्खासारखे चाळे नाही करू शकत नाही. मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मराठा समाजाचे काम करतो दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

 

दरम्यान, आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. आता एक ते दोन दिवसांत पुढील दिशा स्पष्ट करणार आहे. मला राजकारणाचा नाद असता तर ५० उमेदवार उभे केले असते. माझी ताकद दिली असती. माझा राज्यात दबदबा झाला असता, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!