ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका.. अजित पवार संतापले

सांगली वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले. सदाभाऊंनी पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन टीका केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार केला आहे.

आज सांगलीत्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी आपल्या भाषणात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावर टीका केली. विशेष म्हणजे, मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

“ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.

काय म्हणाले सदाभाऊ खोत ?

“शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील…देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं असतात. यामधील अर्धथानं वासराला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. पण, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, गायीचं सगळं दूध वासरांचं(राज्यातील जनतेचं) आहे, मी सगळं दूध वासरांनाच देणार..मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं..?”

“पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या…पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?” अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!