मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आलाय. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत एका सभेत निवृत्तीचे संकेत देणारं विधान केलं होतं. आता या विधानाचा विपर्यास केला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उतरवलंय. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या विधानाबद्दल विचारलं असता शरद पवार यांनी म्हटलं की, ते तसं नाही, मी सभेत सांगत होतो तो कुटुंबाचा विषय होता. मी २५-३० वर्षे तिथे होते, माझ्या नंतर अजित आणि त्यानंतर पुढची पिढी तयार करावी. राहिला विषय मी निवडणूक लढणार नाही याचा तर हे आजचं नाही, २०१४ पासून निवडणूक लढलो नाही.
मी २०१४ नंतर राज्यसभेवर गेलो. सुप्रिया उभा राहिली माझ्या मतदारसंघात. थेट निवडणुकीतून थांबायचं ठरवलंय. आज राज्यसभेवर आहे. माझी दोन वर्षांनी टर्म संपतेय. तेव्हा विचार करू. पण ज्या पद्धतीने मांडलं गेलं, निवडणुका लढणं वेगळं, राजकारणात सातत्य ठेवणं वेगळं, राजकारण आणि समाजकारणापासून बाजूला राहणार नाही. मला शक्य आहे तोपर्यंत मी करतच राहीन. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची लोकसभेला पिछेहाट झाली. या दरम्यानच्या काळात अजित पवार यांची भेट झाली का? पुन्हा समेट घडवण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, “त्यानंतर पुन्हा माझी आणि त्यांची चर्चा झाली नाही. आमची भेटही झालेली नाही.”
बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्रला दिलेली उमेदवारी ही पर्याय नसल्याने दिलीय का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, नवी पिढी आणायचीच आहे. कुटुंबाचा किंवा बारामतीचा प्रश्न नाही. मी २५-३० वर्षे, माझ्यानंतर अजित, आता तिसऱ्या टप्प्यात पुढच्या २५-३० वर्षासाठी कुणीतरी तयार करावं हा हेतू होता. माझा नातू काम करत होता. उच्चशिक्षित आहे, शेती, महाराष्ट्रातल्या त्या भागातलं काम त्याला माहिती आहे. त्याची इच्छा होती. अनायसे जागा रिक्त होती म्हणून निवडणुकीला उभा करण्याचा निर्णय घेतला.