मुंबई वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
नारायण राणेंच्या या टीकेला माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. असे घाणेरडे विचार अशाच घाणेरड्या व्यक्तींना येवू शकतात. मात्र हा प्रकार निंदनीय आहे. उघडपणे उध्दव साहेबांना धमकी देणे यातून त्यांचा हेतू आणि मनात विष आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आलाय. या घाणीवर आम्ही कधी बोलत नाही. पण गेले वीस वर्षे यांना पगार मिळायचा आमच्यावर टीका करायला, आम्हाला शिव्या द्यायला.
उध्दव साहेबांना गोळ्या घालू हे बोलणे निंदनीय आहे. एका जबाबदार नेत्याने असे बेजबाबदारपणे बोलावे? एवढे घाणेरडे वक्तव्य आम्ही कधी ऐकले नाही. हा भाजपचा खरा चेहरा आहे. तसेच अनेक पक्षातील लोक इडीच्या धाकाने भाजपमध्ये गेले आहेत. हे तर मी पहिल्यापासून बोलतोय. एकनाथ शिंदे पण तिकडे त्याच धाकाने गेले आहे. त्यांना जेलमध्ये जायचे नव्हते, म्हणून ते तिकडे गेले. त्यामुळे मी भुजबळ साहेबांचे कौतुक करतो ते स्पष्टपणे तरी बोलले. आज वेळ आली आहे, स्पष्ट बोलण्याची. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.