मुंबई वृत्तसंस्था
माहीम मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सुपुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 मध्ये वरळीतून आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला होता. पण, अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेनं ( ठाकरे गट ) उमेदवार दिला आहे. मात्र, अमितसाठी फालतू भिका मागणार नाही, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
अमित ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी प्रभादेवीत प्रचारसभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. जे कोणाचेच झाले नाहीत, ते त्यांच्यावर काय बोलणार?. बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली आणि पडली. पडल्यावर परत शिवसेनेत आले आणि आमदार झाले. “जेव्हा उद्धव आजारी पडला, तेव्हा पहिला गाडी घेऊन मी गेलो होतो. मी अलिबागला होतो, मला बाळासाहेबांचा फोन आला, ‘अरे तुला कळलं का?’ असं असं झालंय. म्हटलं हो निघालोय मी. मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही.”
“गेल्या वेळेला वरळीला आदित्य उभा होता. तिथे मनसेची 37-38 हजार मते होती. म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार देणार नाही. ही माझ्या मनातून आलेली गोष्ट होती. मी कुणाला फोन नाही केला, की मी येथे उमेदवार देत नाही. किंवा पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या. असल्या फालतू भिका मी नाही मागत. माझ्याकडून चांगुलपणाच्या गोष्टी होतील, तेवढ्या मी केल्या. आज अमित उभा राहत असताना मी देखील भिका मागणार नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.