अक्कलकोट वृत्तसंस्था
राजकीय वाटचालीमध्ये अनेक वेळा अपयशही येते पण हे अपयश पचविण्याची ताकद माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामध्ये आहे आणि ते यावेळी पुन्हा एकदा तालुक्याचे आमदार होतील आणि तालुका सुजलाम सुफलाम करून टाकतील, असा विश्वास इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील यांनी व्यक्त केला.
सोमवारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मंगरूळ मतदारसंघातील सुलेरजवळगेसह अनेक गावांना भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने जेसीबीने फुलांची उधळण करत उत्साही वातावरणात स्वागत केले. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, जल्लोषात केलेल्या स्वागताने मन भरून आले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि पुढील विकासाच्या ठोस मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जात आहे. विरोधकांकडे ना कोणते ठोस काम आहे, ना विकासाची दूरदृष्टी फक्त २०१४ पासून ते आजवर करत आलेल्या फसव्या योजनांच्या व जाती-धर्मात फूट पाडून सत्तेचा खेळ करत आहेत. ज्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला धोका आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा अशी भूमिका त्यांनी मांडली. विरोधक आमच्याबद्दल अप्रचार करत आहेत. आम्हीच त्यांना गेल्यावेळी निवडून आणलो ही चूक झाली. ही चूक यावेळी सुधारून घेऊ आणि त्यांना यावेळी धडा शिकवू. येत्या २० तारखेला ४ समोरील काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंजा ह्या चिन्हासमोरील बटन दाबून म्हेत्रेंना विक्रमी मतांनी विजयी करा, असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी गावकऱ्यांना केले. यावेळी माजी सभापती संजीवकुमार पाटील, महादेव बहिरगुंडे , सुखदेव भिसे पाटील, प्रकाश पाटील , पिंटू पाटील, के. एस. लालसंगी, माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी, शिवसिद्ध बुळळा, आनंद बुक्कानूरे, बंदेनवाज कोरबू, महादेव पाटील, राजकुमार वाघमारे, अशोक निंबर्गी, सिद्धाराम बाके, आंबाराव घोडके, पिरोजी शिंगाडे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते, पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझा विजय निश्चित
विकास कामाचे खोटे आकडे सांगून नुसती दिशाभूल चालू आहे. एकही रस्त्याचे काम नीट नाही.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सर्व कामांबद्दल जनतेला चांगले माहिती आहे.लोक योग्य संधीची वाट पाहत आहेत यावेळी माझा विजय निश्चित आहे.
सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री