सोलापूर वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी शहरातील होम मैदानावर सभा झाला. त्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्याच पद्धतीने सोलापूरचे दौरे आणि त्यावरून शहराशी तयार झालेले नाते यावरही मोदी यांनी भाष्य केले. हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले आहेत, ते सर्व पंतप्रधान जेवढ्या वेळा सोलापूरला आले असतील, त्या पेक्षा जास्त वेळा मी एकटा सोलापूरला आलो आहे. सोलापूरने मला एवढे प्रेम दिले आहे, मी सोलापूरला आलो नाही तर बेचैन होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर आणि आपल्या नात्याबाबत भाष्य केले.
मोदी म्हणाले, पंढरपूरला येणाऱ्या वाकऱ्यांना पहिले चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. पण आम्ही पालखी महामार्ग बनूवन वारकऱ्यांचा तो त्रास कायमचा संपवला आहे. सोलापूरच्या चारही बाजूंंनी महामार्ग बनले आहेत. सोलापूरहून ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू आहे. हा बदल केवळ केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुती सरकारमुळे झालेला आहे.
नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत मोदी हे सहाव्यांदा सोलापूरला आले आहेत. विशेष म्हणजेच एकाच वर्षांत दोनदा ते सोलापूरला येत आहेत, हे विशेष. तब्बल सहा वेळा सोलापूरला येणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. नरेंद्र मादी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले. त्या वेळीही त्यांची होम मैदानावरच जाहीर सभा झाली होती. त्यानंतर उड्डाणपूल आणि विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या मोदी यांचा पार्क मैदानावर कार्यक्रम झाला होता. तो त्यांचा दुसरा दौरा होता.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर आणि अकलूज येथे त्यांच्या सभा पार पडल्या. तसेच, १९ जानेवारी २०२४ रोजी रे-नगर घरकूल प्रकल्पाच्या लोकापर्णासाठीही नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये आले होते. त्यानंतर आजच्या सभेला ते सहाव्यांदा सोलापूरला आले होते, त्यामुळे आतापर्यंतच्या पंतप्रधानांपैकी ते सर्वाधिक वेळा सोलापूला आले आहे.