नाशिक वृत्तसंस्था
सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नाशिकमधील सावता नगर परिसरात ही घटना घडली. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत.
या मतदारसंघात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची सभा होती. ही सभा सुरु असतानाच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना पैसे वाटप करण्याच्या प्रकारातून झाल्याची माहिती आहे. बडगुजर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. भाजपा कार्यकर्ते मुकेश सहानी यांनी आपल्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
या घटनेनंतर अंबड पोलीस स्टेशनच्या परिसरात दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमले होते. त्या ठिकाणी देखील त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सभेनंतर घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी या सर्व प्रकाराचा निषेध केला. या प्रकरणात तातडीनं लक्ष देण्याची विनंती मी पोलिसांकडं केली आहे. त्याचबरोबर गृहमंत्र्यांकडं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.