सिंदखेड राजा , वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. दरम्यान, याआधीच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज प्रसिद्धी पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रकामध्ये असं म्हटले आहे की, “राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, रिपाई (आ) व अन्य घटक पक्ष मिळून “महायुती” महणून, सर्व पक्ष एकत्रित, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सिंदखेड राजा मतदार संघातून मनोज देवानंद कायंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ह्याच मतदार संघात शिवसेना पक्षातर्फे श्री. शशिकांत खेडेकर हे पण उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने असल्याने महायुतीचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे यांच्या सूचनेनेनुसार पक्षाकडून सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचे (महायुतीचे) अधिकृत उमेदवार श्री. शशिकांत खेडेकर यांना पाठींबा जाहीर करण्यात येत आहे, असंही या पत्रामध्ये म्हटले आहे.