ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप .. विरारमध्ये राडा

मुंबई वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून मतदानाला अवघे काही तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. बविआ कार्यकत्यांनी घेरल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावरून जोरदार राडा सुरू आहे. कार्यकर्त्यांकडून तावडेंना घेरण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी या हॉटेलचा ताबा घेतला आहे. तावडेंनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. याठिकाण पोलिस दाखल झाले असून बविआ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

बविआ कार्यकर्त्यांकडून पैसे आणि पाकिटे दाखविली जात असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे आता यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला विनोद तावडेंचा फोन आला होता, असा दावा केला आहे. तावडेंनी आपली माफी मागितल्याचा दावाही ठाकूर यांनी केला आहे.  या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर टीका करत आहेत. तर युतीचे नेते सावरासावर करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान बविआचे आमदार क्षितिज ठाकूरही हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तावडे यांच्याकडे पैसे आणि पाकिटे आढळून आल्याचा आरोप बविआकडून केले जात आहेत. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचेही समजते. ठाकूर यांनी पोलिसांशी वाद झाल्याचे समोर आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!