मुंबई, वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून नियमभंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर अकाउंटवरून १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०५ मिनिटांनी ”भाजपाच्या कच्च्या बच्च्यांची अत्यंत घाणेरडी मानसिकता! फोडा आणि राज्य करा खोटं बोला आणि जिंकायचा प्रयत्न करा ! @ECISVEEP आणि @Mumbai Police कधी अशा घाणेरड्या द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार का आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यांना अटक करणार का? तुमच्या मतांसाठी आमच्या जनतेच्या भावनांशी खेळू नका!” अश्या आशयाचा मजकूर ट्विट केला आहे. आचासंहितेच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार किंवा राजकीय टीका टिप्पणी करण्यास बंदी आहे. मात्र, या ट्विटमुळे झालेले नियमांचे उल्लंघन लक्षात घेता निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे.
आदित्य ठाकरे यांनी खोडसाळ पद्धतीने द्वेष पसरवण्याच्या हेतूने आणि सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे; त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्या या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून निवडणूक आयोगाने आदित्य ठाकरे यांच्यावर त्वरित करून त्यांचे ट्विटर खात्यावर निर्बंध आणावेत अशीही मागणी मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी केली आहे.