ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात महाविकास आघाडीला किती जागा ? नाना पटोले यांनी सांगितले गणित !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून त्यानंतर आता एक्झिट पोलमुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. कारण अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणालाच स्पष्ट बहूमत मिळताना दिसून येत नाहीये. त्यामुळे आता दोन्ही बाजुंनी आमदारांचे आकडे निकालाआधीच जुळवायला सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. 175 च्यावर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा येतील, 75 च्या जवळपास किंवा त्यापेक्षा अधिक काँग्रेसचे आमदार निवडून येतील. काँग्रेसचा स्ट्राईक सर्वात चांगला असेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडून आलेल्या आमदारांना तातडीने हलवण्याची आमची तयारी आहे, भाजपची राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची जी परंपरा आहे त्यामुळे आम्ही अलर्ट राहू, सगळीकडे नजर ठेवून आहोत. त्या पद्धतीने काम करणार आहे. आम्ही मुंबईत राहणार आहोत, तसेच अपक्ष आमदारांच्या संपर्कात देखील असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? यावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर आज प्रतिक्रिया देणे बरोबर नाही. सर्व काँग्रेसच्या उमेदवारांशी बोलणार, मतमोजणी संदर्भात सगळ्या सूचना देणार आहोत. काही सीट या घासून चालत असल्यामुळे त्या जिंकू. पण, थोडी टफ झाल्यास हरियाणामध्ये ज्या पद्धतीने भाजपने घोळ घातला, तसा घोळ इथे घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही अलर्ट राहणार आहोत. मी स्वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे.
दरम्यान आम्ही सर्व बंडखोर उमेदवार आणि अपक्ष आमदारांच्या देखील संपर्कात आहोत. असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे. उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे, यावर प्रतिक्रिया देताना नान पटोले म्हणाले की, अदानी यांना भारतात अटक व्हावी अशी मागणी राहुल गांधी करत आहेत, आमची देखील तीच मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!