ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का देणार ?

आमदार कल्याणशेट्टी आणि म्हेत्रेंच्या भवितव्याचा उद्या फैसला

अक्कलकोट : मारुती बावडे

अक्कलकोट विधानसभा मतदार संघात अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन होणार की पुन्हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीच सत्ता येणार याचा फैसला उद्याच होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे वाढीव टक्का कोणाला धक्का देणार हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.आमदार कल्याणशेट्टी यांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात आहे.त्यांनी न भुतो न भविष्यती अशा पद्धतीने ही निवडणूक अंगावर घेतली आणि परफेक्ट नियोजन केले.दुसरीकडे म्हेत्रे यांनी देखील ‘अभि नही तो कभी नही’ असा नारा देत यंत्रणेत कुठेही कमी न पडता लढत दिली.त्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेची चर्चा गेले काही दिवस तालुक्यात सुरू आहे.अक्कलकोट तालुक्यात नेहमीच काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळाली आहे.

यापूर्वी अक्कलकोट विधानसभेचा झालेला निकाल पाहता १९९५ आणि २००९ आणि २०१९ ची निवडणूक वगळता याठिकाणी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे.आतापर्यंत अकरा वेळा काँग्रेस, तीन वेळा भाजप आणि एक वेळा जनता पक्षाने ही निवडणूक
जिंकली आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.त्याची मदत आमदार कल्याणशेट्टी यांना देखील झाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा,आमदार पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावून कल्याणशेट्टी यांचा प्रचार केला होता.दुसरीकडे म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,धैर्यशील मोहिते पाटील यांनी हजेरी लावून काँग्रेसला जिंकून देण्याचे आवाहन केले होते.या निवडणुकीत लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे मतदान हे निर्णय ठरल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.हा मतदारसंघ मुळात लिंगायत
बहुल समजला जातो.

आता हा समाज  नेमका कोणाच्या पाठीशी राहतो त्यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहेत. त्यापाठोपाठ मुस्लिम समाजाची मते देखील या निवडणुकीची गणिते फिरवू शकतो, अशी चर्चा आहे.भाजप आणि काँग्रेसची परंपरागत मते त्यांनाच मिळतील,अशी आशा दोघांना पण आहे पण दोन्ही पक्षांच्या मतांची विभागणी झाल्याने निकाल कोणाला धक्का देणार याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे.पण यावेळसची निवडणूक जेष्ठ नेत्यांविरुद्ध युवा नेते अशी झाल्याने युवकांचा कल कोणाकडे राहणार हे पण फार महत्वाचे आहे.याचीही उत्सुकता सर्वांना आहे.गेल्या वेळेस झालेल्या म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी यांच्या लढतीत कल्याणशेट्टी हे ३७ हजार मतांनी विजयी झाले होते.त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत गेल्या वेळेसचे मताधिक्य घटून भाजपचे मताधिक्य हे साडेनऊ हजार पर्यंत आले होते.या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाल्याने चुरस निर्माण झाली होती.निकालाबाबत मतदारसंघात अनेक अंदाज बांधले जात आहेत.पैजालावल्या जात आहेत.प्रत्येक वेळच्या निवडणुकीत
मुद्दे हे वेगवेगळे असतात.त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची बनली होती.यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे परंपरागत मतदार हे मोठ्या प्रमाणात फुटले असल्याने निकालाचा अंदाज वर्तविणे अवघड झाले आहे.दोन्ही पक्षाकडून जरी विजयाचा दावा केला जात असला तरी ठामपणे मीच निवडून येतो असे सांगणे दोघांच्याही दृष्टीने धाडसाचे ठरत आहे. उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत हा निकाल स्पष्ट होणार आहे.मात्र सकाळच्या दोन तासातच बर्‍यापैकी चित्र स्पष्ट होईल असा एक अंदाज आहे.त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या उद्याच्या दिवसाकडे लागल्या आहेत.

निवडणुकीत मोठी चुरस

माजी आमदार म्हेत्रे हे तसे पाहिले तर १९९५ ते ९८ पासून राजकारणात आहेत.आमदार कल्याणशेट्टी हे गेली दहा ते बारा वर्ष झाले राजकारणात आहेत पण त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.या निवडणुकीत एक अनुभवी चेहऱ्याविरुद्ध युवा चेहरा अशी लढत झाल्याने यात बाजी कोण मारणार हे आता पाहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!