ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात ; भाजपच्या नेत्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, असा खळखळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी आणि राज्याच्या हिताच्या निर्णयासाठी शरद पवार कोणत्याही क्षणी महायुतीला पाठिंबा देतील, असे मला वाटते, असे देखील नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये कोणतेही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नसल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. शरद पवार हे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेस सोबत राहणार नाहीत. तर शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, असा दावा त्यांनी केला. नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. त्यामुळे आता या घटना घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.

यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून शिवसेनेचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिले नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन दिवस मत्रलयात गेले होते, अशी टीका देखील त्यांनी केली. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणे देखील कठीण होईल, अशा शब्दात राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीची साथ सोडून महायुती सोबत हात मिळवणी करू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. तसे झाले तर राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होतील, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!