विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी माजी सैनिक संघटना तत्पर
चुंगी येथे विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा उत्साहात
अक्कलकोट, वृत्तसंस्था
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून माजी सैनिक संघटना विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. यात मुलांच्या विचाराला चालना आणि गती मिळण्यासाठी शालेय स्तरावर सुद्धा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष बापूराव सुरवसे यांनी सांगितले.
चुंगी (ता. अक्कलकोट) येथे माजी सैनिक सैनिक संघटनेतर्फे जागर विचारांचा हा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तालुक्यात सध्या अनेक जण देश सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तरीही ते देशसेवेपासून दूर झालेले नाहीत. काही ना काही तालुक्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनतेची सेवा करत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे.
या उपक्रमांना अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांचीही मोलाची साथ आहे, असे माजी सैनिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल फडतरे यांनी सांगितले. किणी केंद्रस्तरावर ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यात जि.प.प्रा.शाळा चुंगी येथील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात सहभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम अवंती नामदेव चव्हाण, आयमत सैपन तांबोळी, द्वितीय स्वरा गोविंद मोरे, तृतीय क्रमांक सुकन्या स्वामीनाथ कलकोटे यांनी पटकावले. या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद शाळेच्यावतीने माजी सैनिक संघटनेचे कौतुक करण्यात आले. यावेळी संघटनेचे खजिनदार रामचंद्र शिंदे, मेजर शिवाजी फडतरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.