ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर

मुंबई वृत्तसंस्था 

 

राज्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून सध्या विधानसभेचे कामकाज सुरु आहे. मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.

राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यानंतर आता झालेल्या २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!