सोलापूर, वृत्तसंस्था
घरच्या घरी बसून लघुउद्योग करण्याचे आमिष देऊन सोलापूर शहरातील महिलांकडून कागदपत्रे व पैसे घेत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. द्रोण-पत्रावळी बनवा, पेन्सिल पॅकिंगचे काम, उदबत्ती व मेणबत्ती बनवण्याचे काम करणे, मशिनवर कापसाच्या वाती करणे, वात बंडल करणे आदी कामे देतो. तसेच या वस्तू बनविण्यासाठी स्वस्तात मशिन उपलब्ध करून देत, कर्जाची सोयही करून देतो. इतकेच नव्हे तर हा केलेला मालदेखील आम्हीच खरेदी करू. तुम्हाला बाजारात जायचीच गरज नाही, अशी बतावणी करून गवळी वस्ती, आमराई, दमाणीनगर, जुनी लक्ष्मी चाळ, मरिआई चौक आदी भागातील महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
सोलापूर शहरातील हजारो बेरोजगार महिलांना पॅकिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनामत रक्कम म्हणून २१०० रुपये घेण्यात आले. पेन्सिल पॅकिंगला दोन हजार रुपये, पेन पॅकिंग दोन हजार रुपये, पापड उद्योग पाच हजार, भडंग पॅकिंग पाच हजार रुपये, मेणबत्ती पॅकिंगला दोन हजार, तर फरसाण आणि चिवडा पॅकिंगला पाच हजार रुपये, मसाला पॅकिंग पाच हजार रुपये, पाणीपुरी पॅकिंग पाच हजार रुपये, टिकली पॅकिंग दोन हजार रुपये, रबर पॅकिंग दोन हजार रुपये, अगरबत्ती पॅकिंग दोन हजार रुपये, चॉकलेट पॅकिंग ५००० रुपये उद्योग समूहाच्या प्रमुखाने वसूल केले होते. या बदल्यात एका महिलेला दररोज २०० रुपये वाटप केले जाईल, असे सांगण्यात आले. शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन या महिलांना दररोज पॅकिंगला दिला जात होता. त्यांच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, असे आश्वासनही दिले होते. महिना पूर्ण झाल्यावर तुमचा हिशेब केला जाईल, असे सांगण्यात आले होते. खुशी महिला गृहउद्योग, पुणे या नावाने महिलांना पावत्या दिल्या जात होत्या. सुमारे १ हजारहून अधिक महिलांची अनामत रक्कम घेऊन संस्थाचालक फरार झाला असल्याचे उघडकीस आले.
फसवणूक झाल्यास काय करावे
गुन्ह्याची तक्रार योग्य एजन्सी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना करावी.
गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे गोळा करावीत, जसे की बँक स्टेटमेंट, क्रेडिट रिपोर्ट इत्यादी.
सायबर फसवणुकीच्या बाबतीत, सायबर-क्राइम हेल्पलाइन नंबर १९३० डायल करावा.
http://www.cybercrime.gov.in वर लॉग इन करूनही तक्रार देता येते.
घटनेच्या २४ तासांच्या आत तक्रार नोंदवावी.
या जगात कुणीच कुणाला फुकट काही देत नाही. घरगुती महिला आपापल्या कामात व्यस्त असतात. तसेच त्यांना अनेक ताण असतात. तसेच त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात. महिलांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. या जगात कुणीच काहीही फुकट देत नाही. जेथे असे सांगितले जाते, तेथे नक्कीच फसवणूक असते. जी काही खरेदी किंवा काम असेल ते अधिकृत ठिकाणाहून करावे. असा फसवणुकीचा प्रकार होत असल्याचे जाणवले तरी ११२ हा क्रमांक डायल करावा किंवा शेजारी पाजारी यांना आवाज देत आपले नुकसान टाळावे.
-डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त