ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार ?

मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था 

राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकी पार पडून सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. त्यातच आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मत दिले. तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळाले. या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला आहे. असे असतानाच आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑपरेशन लोटस संदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने केल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. लवकरच हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्याने दिली आहे. मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले कोणते खासदार भाजपामध्ये जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे झाले तर हा 2019 च्या राजकीय नाट्यापेक्षा मोठी घडामोड असेल असे मानले जात आहे.

तसेच भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार, विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. मात्र हे खासदार नेमके कोण यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 खासदार आहेत. 2024 साली एप्रिल-मे महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 30 जागांवर विजय मिळवला. यापैकी काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत निवडणूक लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच 9 खासदार निवडून आले. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आहेत. भाजपाला 9 जागी विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेने 7 जागी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागी विजय मिळवता आला. एक अपक्ष उमेदवार जिंकून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!