सोलापूर, वृत्तसंस्था
जलद मदत करण्यात सोलापूर शहर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. शहराची हद्द कितीही विस्तारली, तरीदेखील सोलापूर शहर पोलिसांकडून ‘डायल ११२’वर संपर्क करणाऱ्या अडचणीतील व्यक्तींना अवघ्या पाच ते सात मिनिटात पोलिसांची मदत मिळत असल्याची बाब समोर आली आहे. पण, विनाकारण मुद्दामहून कोणी कॉल केल्यास त्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल होवू शकतो.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे, डॉ. दीपाली काळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात रात्री दहानंतर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली होती. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणारे दिसत नव्हते. आता रात्री अकरानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे. विनाकारण रात्री उशिरापर्यंत कोणी हुल्लडबाजी करीत फिरत असलेल्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. त्यासाठी ठरावीक चौकांमध्ये पोलिसांची नाकाबंदी देखील असेल. मद्यपान करून कोणी वाहन चालवत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. शहरातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी हा त्यामागील हेतू आहे.
रेल्वे स्थानकाजवळील शहर पोलिसांची चौकी काढून टाकण्यात आली आहे. रात्री १०.३० नंतर या परिसरात रिक्षा चालकांची मोठी गर्दी असते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ अंधार असतो. रेल्वेतून उतरून बाहेर आलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी रेल्वे स्टेशनबाहेर आता रात्री ११ नंतर वाहतूक व सदर बझार पोलिस ठाण्याचे काही अंमलदार त्याठिकाणी नेमले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांची मनमानी बंद झाली असून प्रवाशांनाही सुरक्षित वाटत असल्याची स्थिती आहे.
सोलापूर शहराच्या हद्दीतील अडचणीतील कोणत्याही व्यक्तीला पोलिसांची मदत हवी असल्यास ते ‘डायल ११२’वर संपर्क करू शकतात. शहर हद्दीत कमीत कमी पाच मिनिटात तर जास्तीत जास्त सात मिनिट २० सेकंदात पोलिसांची मदत त्या अडचणीतील व्यक्तींना मिळते.
– विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर