सोलापूर, वृत्तसंस्था
सामाजिक शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी प्रत्येक वरिष्ठ पोलिस अधिकारी तत्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात. अनेकदा राजकीय दबाव आणला जातो, तरीदेखील पोलिस अधिकारी समाजहिताला बाधा आणणाऱ्यांना तडीपार करतात. मागील पाच वर्षांत सर्वाधिक तडीपारीची कारवाई विद्यमान पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी शहरातील तब्बल ७२ जणांना एकाच वर्षात तडीपार केले आहे.
गुंडप्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार, सार्वजनिक शांतता भंग करून सामाजिक सुरक्षितता व शांतता धोक्यात आणणारे लोक, खंडणी मागत धमकावणे, शासकीय कामात अडथळा आणून सरकारी नोकरांना कर्तव्य पार पाडताना अडथळा आणणे, असे गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारीची कारवाई केली जाते. तरीसुद्धा त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्या पुढचा टप्पा म्हणून त्या सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ची कारवाई केली जाते. या कारवाईनंतर त्या सराईत गुन्हेगाराची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली जाते.
महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ५५, ५७ अंतर्गत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर तर कलम ५६ अंतर्गत वैयक्तिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. एम. राजकुमार यांनी एकाच वर्षात सात टोळ्यांमधील २४ जणांना तडीपार करण्यात आले. २०२० ते २०२४ या पाच वर्षांत पोलिस आयुक्तांनी एकूण ३० टोळ्यांमधील १०७ जणांना तडीपार केले आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या रडारवर अजूनही तीन टोळ्या असून, वैयक्तिक स्वरूपाच्या ४० जणांवरही तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते. तत्पूर्वी, नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्याला नोटीस पाठवून सुधारण्याची एक संधी दिली जाते. तरीदेखील, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याला किमान दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. मागील पाच वर्षांत सोलापूर शहरातील २५२ जणांना तडीपार करण्यात आले आहे. १ जानेवारी ते १२ डिसेंबर २०२४ या एकाच वर्षात शहरातील ७२ जणांना तडीपार करण्यात आले असून, त्यात सात टोळ्यांमधील २४ जणांचा देखील समावेश आहे. अजूनही ४० सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत. त्यातील बहुतेकांना शेवटची नोटीस बजावण्यात आली असून आता त्यांनी गुन्हा केला की, त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई होणार आहे.
तडीपारीच्या कारवाईनंतर संबंधित गुन्हेगार पुन्हा निर्बंध घातलेल्या जिल्ह्यांमध्ये दिसायला नको. त्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क असतेच, याशिवाय त्याच्या घरावर क्यूआर कोड बसविला जातो. आठवड्यातून एकदा अचानकपणे त्याच्या घरी पोलिस भेट देऊन पाहणी करतात. तेथून त्या सराईत गुन्हेगाराला संपर्क करून त्याचे लोकेशन घेतले जाते. त्याने नियम मोडल्यास त्याच्यावर पुन्हा महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार कारवाई होते.