ध्यास विश्वसार्ह बातमीचा

23 मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, तर हे सर्वात कमी शिकलेले

मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक एकदा वाचाच

मुंबई, वृत्तसंस्था 

23 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 5 डिसेंबरला महायुती  सरकारचा शपथविधी पार पडला होता. तर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामधील मंत्र्यांबद्दल जाणून घेऊया..

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळातील तब्बल 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद आहेत. दोनजण दहावी पास असून नऊ मंत्री केवळ बारावीपर्यंत शिकलेले आहेत. चार जणांनी पदविका पूर्ण केलीय तर पाच मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. 18 मंत्री पदवीधर आहेत. या यादीतील फक्त भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. गोगावले आठवी पास आहेत. गोगावले यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांना अखेरच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळांचं अध्यक्षपद दिलं होतं. महायुती सरकारच्या नव्या मत्रिमंडळाचा शपथविधी अखेर काल नागपूरमध्ये पार पडलाय. नव्या मंत्रिमंडळात सात वकील आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जणांनी वकिलीची पदवी घेतलेली आहे. पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत.

या मंत्रिमंडळात अजित पवार गटातील अदिती तटकरे (वय 36) सर्वात तरूण मंत्री, तर गणेश नाईक ( वय 74) हे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. तर तब्बल 16 मंत्री साठीपार आहेत. तटकरे यांची दुसऱ्यांदी मंत्री म्हणून निवड झालेली आहेत. शपथ घेतलेल्या 39 मंत्र्यांपैकी 23 मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर 38 तर मेघना बोर्डिकर यांच्यावर 13 आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्यावर 9 गुन्ह्यांची नोंद आहे. तर सोळा मंत्र्यांवर मात्र कोणताही गुन्हा नोंद नाही.

या यादीतील सर्वात श्रीमंत मंत्री भाजपचे मंगलप्रभात लोढा आहेत, तर सर्वात गरीब मंत्री दादा भुसे आहेत. मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी 9 लाख 23 हजार रुपये आहे. त्यानंतर यादीत दुसरा क्रमांक शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा लागतो. त्यांची एकूण संपत्ती 333 कोटी 32 लाख 95 हजार रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्यांची संपत्ती 128 कोटी 41 लाख 81 हजार रुपये आहे, तर शिवसेनेचे दादा भुसे यांची संपत्ती 1 कोटी 60 लाख 85 हजार रुपये आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!